पंचकर्म म्हणजे काय? (Marathi Blog No – 03) Blog – 54

पंचकर्म, पंचकर्म, पंचकर्म….आज काल आपण सगळीकडे ऐकतो कि पंचकर्म म्हणजे तेलाने मसाज, पंचकर्म म्हणजे जुलाब, उलट्या वगैरे.

पण पंचकर्म म्हणजे नेमके काय ?

चला मग जाणून घेऊन आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये ‘पंचकर्म म्हणजे काय ?

पंचकर्म –

पंच म्हणजे ५ आणि कर्म म्हणजे क्रिया.

पंचकर्म म्हणजे अश्या ५ क्रिया ज्याने शरीराची शुद्धी होते किंवा शरीराला ताकत मिळते.

  • शरीरशुद्धी पंचकर्ममध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो

      1. वमन

2. विरेचन

3. बस्ती

4. नस्य

5. रक्तमोक्षण

  • शरीराला ताकत देण्याऱ्या पंचकर्ममध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो –    

1. स्नेहन

2. स्वेदन

3. नस्य

4. शिरोधारा

5. बस्ती

नस्य आणि बस्ती यांचा दोन्ही पंचकर्ममध्ये समावेश होतो कारण नस्य आणि बस्ती ह्या कर्मासाठी ज्या प्रकारचे तेल, तूप, काढे वापरले जातात त्यानुसार त्यांनी शरीरशुद्धी होते किंवा शरीराला ताकत मिळते हे ठरते . त्यामुळे त्यांचा दोन्ही पंचकर्मात समावेश होतो.

पहिले जाणून घेऊया शरीरशुद्धी पंचकर्माबद्दल

वमन व विरेचन

कालावधी – वमन व विरेचन या शरीरशुद्धी क्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.

शास्त्र – या क्रियेमध्ये तुमची पचन शक्ति ही शरीरशुद्धीसाठी वापरली जाते. त्यामुळे ‘जगण्यापूरते खाणे’ हा मंत्र १५ दिवस पाळवा लागतो . म्हणजे या शरीरशुद्धी क्रियेमध्ये पचनशक्तिला त्याच्या नेहमीच्या पचनक्रियेपासून विश्रांती द्यावी लागते आणि त्या पचनशक्तिचा शरीरशुद्धीसाठी वापर करायचा असतो हा येथे हेतू असतो .

विधी –  वमन/विरेचन विधी हा चार विभागात विभागला जातो.

  1. स्नेहपान
  2. प्रधान कर्म
  3. संसर्जन क्रम
  4. अपुनर्भव चिकित्सा

1. स्नेहपान – वाढत्या प्रमाणात औषधी तूप सेवन करणे.

हा विधी साधारण ५ ते ६ दिवस चालतो. ह्या क्रियेमध्ये वाढत्या प्रमाणात औंषधी तूप पिण्यास देतात . वाढत्या प्रमाणात म्हणजे पहिल्या दिवशी  ४ चमचे, दुसऱ्या दिवशी ८ चमचे मग १२, १६ असे. तूप पिल्यावर गरम पाणी पित राहणे आणि जेव्हा तूपाचे ढेकर यायचे बंद होतील, म्हणजे तूप पचले आहे. त्यानंतर तहाण लागेल तेव्हा गरम पाणी पिणे आणि भूक लागेल तेव्हा मूग आणि भाताची खिचडी खाणे हा सर्वसामान्य विधी असतो.

या औषधी तूपामुळे आपल्या शरीरातील आम (टॉक्सिन्स) पातळ होतो.

त्यानंतर स्नेहन म्हणजे मसाज आणि स्वेदन म्हणजे स्टीमबाथ दिली जाते .

स्नेहन व स्वेदन-इथे स्नेहन व स्वेदनामुळे शरीरातील पातळ झालेला आम (टॉक्सिन्स) शरीराच्या मध्य भागी आणणे हा उदेशअसतो. ज्याप्रमाणे आपण घराची साफ सफाई केल्यावर कचरा खाली पडतो मग आपण तो कचरा गोळा करतो आणि नंतर बाहेर फेकतो. त्याप्रमाणे स्नेहपान क्रियेमुळे शरीरातले आम (टॉक्सिन्स) पातळ झाल्यावर स्नेहन स्वेदन कर्मामुळे सर्व आम (टॉक्सिन्स) शरीरातील मध्यभागी आणला जातो .

2. प्रधान कर्म –

स्नेहन आणि स्वेदनकर्म झाल्यानंतर जेव्हा हा आम (टॉक्सिन्स) उलटी द्वारे बाहेर काढला जातो तेव्हा त्या कर्मास वमन कर्म असे म्हणतात आणि जर हा आम (टॉक्सिन्स) जुलाबांद्वारे बाहेर काढला जातो तेव्हा त्या कर्मास विरेचन असे म्हणतात.

3. संसर्जन कर्म –

हा विधी १० व्या दिवसापासून १५ व्या दिवसापर्यंत असतो. उपवास सोडताना जसे आपण पहिले हलके अन्न खातो व नंतर हळूहळू जड अन्न खाण्यास सुरुवात करतो त्याप्रमाणे वमन आणि विरेचन या विधीत आपला एकप्रकारे उपवासच होतो. त्यामुळे प्रधान कर्मानंतर आपण हळुहळु हलके अन्न खाण्यास सुरुवात करतो जसे पहिल्या दिवशी भाताची पेज, नंतर मऊ भात, मग खिचडी, भाकरी. असे हळु हळु पचनास जड पदार्थ क्रमाने खाण्यास सुरुवात करतात म्हणून या विधीस संसर्जन क्रम असे म्हणतात .

अपुनर्भव चिकित्सा –

अपुनर्भव म्हणजे ‘आजार परत होऊ नये म्हणून करावयाची चिकित्सा’ म्हणजे Preventive treatment. या विधीमध्ये पंचकर्म शरीरशुद्धी झाल्यावर शरीराला ताकत देण्यासाठी व परत आजार होऊ नये म्हणून पुढे १५ दिवस औषधे ,औषधी तूप , रसायन कल्प दिले जातात , ज्यांचा सेवनाने आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला आजार होत नाही.

वमन आणि विरेचन कधी करावे ?

निरोगी व्यक्तीनी वसंत ऋतु मध्ये म्हणजे फेब्रुवारी/मार्च मध्ये वमन करून घ्यावे आणि शरद ऋतुमध्ये म्हणजे सप्टेंबर /ऑक्टोबर मध्ये विरेचन कर्म करून घ्यावे.

आजारी व्यक्तीनी पंचकर्म कधी करावे?

ज्यांना आजार असेल त्यांनी वैद्याच्या सल्यानुसार आणि आजाराच्या गांभीर्यानुसार वर्षभरात कधीही वमन किंवा विरेचन हे कर्म करून घ्यावे.

वमन/विरेचन कर्मापैकी कोणते कर्म कोणी करावे?

त्यासाठी सुद्धा वैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तरी ढोबळ मानाने कफ प्रकृतीच्या लोकांनी आणि ज्यांना कफाचे आजार आहेत जसे जुनाट सर्दी, खोकला, दमा, स्रावी त्वचारोग, स्थौल्य, थाईरॉईड, मधुमेह आदि त्यांनी वमन कर्म करून घ्यावे आणि ज्या लोकांची प्रकृती पित्ताची आहे आणि ज्यांना पित्ताचे आजार आहेत जसे डोकेदुखी, एसिडिटी, गॅसेस,पचनाचे विकार, पाळीच्या तक्रारी, त्वचारोग आदि अशा लोकांनी विरेचन कर्म करून घ्यावे .

वर्षातून किती वेळा पंचकर्म करावे?

घराची साफसफाई जशी आपण वर्षातून एकदा करतो त्याप्रमाणे वर्षातून एकदा वमन किंवा विरेचन कर्म आपल्या प्रकृती व आजारानुसार करवून घ्यावे .

फायदे –

१. शरीरशुद्धी होते.

२. शरीराला ताकत मिळते.

३.अपुनर्भव चिकित्सा – या विधीमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते.

ही वमन व विरेचनबद्दल थोडक्यात माहिती होती.तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही aarogyam.ayurvedic.clinic@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधू शकतात.

पुढील ब्लॉग मध्ये आपण बस्ती कर्माबद्दल माहिती करून घेऊया .

Advertisements
%d bloggers like this: